सांगलीची प्रतीक्षा बागडी (Pratiksha Bagdi) ही पहिली महाराष्ट्र केसरी (First Women Maharashtra Kesari) ठरली आहे. तिने अंतिम सामन्यात कल्याणच्या वैष्णवी पाटीलचा (Vaishnavi Patil) पराभव केला. तिला चांदीची मानाची गदा आणि ५१ हजार मानधन सुपूर्द करण्यात आली आहे.
प्रतीक्षा आणि वैष्णवी यांच्यात रंगलेली फायनलची लढत अत्यंत चुरशीची झाली. सुरुवातीला वैष्णवी पाटीलने सगल ४ गुण घेत आघाडी मिळवली होती. मात्र, पुढच्याच डावात प्रतीक्षा बागडीने वैष्णवीला चितपट करत सामना जिंकला.
महाराष्ट्राच्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीच्या मिरजेत पार पडल्या. या स्पर्धांसाठी राज्यातील जवळपास ४०० हून अधिक महिला कुस्तीपटू दाखल झाल्या होत्या. सांगलीच्या जिल्हा क्रीडा संकुलात या पहिल्याच महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्य कुस्तीगीर परिषद व सांगली जिल्हा तालीम संघातर्फे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. गुरुवारपासून (२३ मार्च) ही स्पर्धा सांगलीच्या मिरजेत रंगली होती. हिंदकेसरी दिनानाथ सिंग यांच्या हस्ते कुस्तीच्या या शानदार स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले होते.
महाराष्ट्र केसरी जिंकल्यानंतर प्रतीक्षाची पहिली प्रतिक्रिया
“खूप छान वाटतंय. पहिली महाराष्ट्र महिला केसरीची गदा माझ्या खांद्यावर आलेली आहे. सगळ्यांचं कष्ट सार्थकी ठरलेली आहे. महिलांसाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ठेवली हीच मोठी गोष्ट आहे. मी पैशांसाठी खेळलेली नाही. खूप मोठा मान मिळालेला आहे. माझ्या पूर्ण कुटुंबाला मी गदा अर्पित करते. माझ्यासोबत माझे वडील खूप कष्ट करत आहेत. माझ्या कुटुंबियांचा मला पूर्ण पाठिंबा होता. त्यांच्या मेहनतीला हे यश आलेलं आहे”, अशी प्रतिक्रिया प्रतीक्षाने दिली.